छत्रपती संभाजीनगर: मुंबईहून उत्तर प्रदेशकडे भावाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका कुटुंबावर समृद्धी महामार्गावर दुहेरी संकट कोसळले आहे. भावावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या बहिणीचा रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तोलुक्यातील जांबरगाव शिवारात घडली.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले यादव कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास होते. या कुटुंबातील लालजी यादव (वय ६५) यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. लालजी यादव यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात नेण्यासाठी कुटुंबाने खाजगी रुग्णवाहिका (क्र. बीडी ०३ टी ९७२५) केली होती.
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ही रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावरून जात असताना जांबरगाव शिवाराजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिकेने समोर चालणाऱ्या एका ट्रकला जोराची धडक दिली.
एकाच कुटुंबावर दुहेरी आघात या भीषण अपघातात लालजी यादव यांची बहीण सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय ४९) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या आपल्या भावाच्या पार्थिवाशेजारी बसल्या होत्या. दुर्दैव म्हणजे भावाच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या सावित्रीदेवी यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
या अपघातात सावित्रीदेवी यांचे पती भगवती प्रसाद यादव हे गंभीर जखमी झाले असून, रुग्णवाहिकेतील इतर तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, भावाच्या निधनाचे दुःख पचवण्याआधीच बहिणीचा असा करुण अंत झाल्याने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा