वडीलांचा आईला फोन; रक्ताच्या उलट्या झाल्याची माहिती, घरी येऊन पाहिलं तर...


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात एका १८ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णवी संतोष नीळ असे मृत तरुणीचे नाव आहे. ती वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती.

ही घटना शुक्रवारी (ता. १९) दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास वैष्णवी महाविद्यालयातून घरी आली होती. तिचे वडील संतोष यादवराव नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावर पानटपरी चालवण्यासाठी बाहेर गेले होते, तर आई मथुरा या शेतात कामासाठी गेलेल्या होत्या. वैष्णवीचा लहान भाऊ प्रीतेष सकाळीच शाळेत गेला असल्याने दुपारच्या वेळेस घरात वैष्णवी एकटीच होती.

दरम्यान, दुपारच्या सुमारास संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच मथुरा यांच्यासह नातेवाईकांनी तातडीने घराकडे धाव घेतली. मात्र, घरी पोहोचल्यावर त्यांना जे दृश्य दिसले, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचा गळा चिरलेला आढळून आला. तिला तात्काळ घराबाहेर ओसरीत आणण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पाचारण केले. घरातील वस्तू, रक्ताचे डाग तसेच परिसरातील हालचालींची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. आई-वडील घरी नसताना वैष्णवीसोबत नेमके काय घडले, घरात कोणी बाहेरचा व्यक्ती आला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर तसेच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याची नोंद पोलिस रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुरमी गावासह गंगापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

---

टॅग्स:

#ChhatrapatiSambhajinagarCrime
#GangapurCrime
#MurmiVillage
#VaishnaviNeel
#MarathiCrimeNews
#AurangabadRuralNews
#MurderCase
#PoliceInvestigation
#ForensicTeam
#12thStudentCrime
#s9marathinews

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा