महाराष्ट्रात शुक्रवारी 139 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील 54 तर ठाण्यातील 30 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि जळगावमध्ये प्रतेकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोनाबळींची एकूण संख्या 2 हजार 449 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 2 हजार 436 नवे करोनाबाधित आढळले असून, आज पर्यंत सध्या राज्यात 42 हजार 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 1 हजार 475 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 35 हजार 156 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 46 शासकीय आणि 37 खासगी अशा एकूण 83 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण 3 हजार 827 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2 हजार 832 इतके आहे.
- राज्यात 5 लाख 45 हजार 947 नागरिक घरात विलगीकरणात असून, सध्या 30 हजार 291 संस्थात्मक विलगीकरणात आहेत, टोपे यांनी सांगितले.राज्यात शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे-93 (मुंबई 54 , ठाणे 30, वसई विरार 1, कल्याण डोंबिवली 7, भिवंडी १) नाशिक-24 (जळगाव 14, नाशिक 3, मालेगाव 8), पुणे-16 (पुणे 14, सोलापूर २), कोल्हापूर- 5 (रत्नागिरी 5), औरंगाबाद-8 (औरंगाबाद 5, जालना 1, परभणी 2), लातूर- 3 (लातूर 1, उस्मानाबाद 1, नांदेड 1), औरंगाबाद-1 असे आहेत. यात 75 पुरुष तर 64 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 139 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 78 रुग्ण आहेत, तर 53 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 8 जण 40 वर्षांखालील आहेत. या 139 रुग्णांपैकी 110 जणांमध्ये (79 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यात सध्या तीन हजार 479 प्रतिबंधित विभाग क्रियाशील असून, शुक्रवारी एकूण 18 हजार 026 सर्वेक्षण पथकांनी काम केले. या पथकांनी 69.18 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले, असे टोपे यांनी सांगितले.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा