लातूर हादरले: चार दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह पुरुषासह तलावात आढळला; नळेगावात खळबळ
लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह गावाजवळील घरणी नदीच्या पात्रात (विसर्जन तलाव क्षेत्र) तरंगताना आढळून आला आहे. विशेष म्हणजे, या महिलेसोबतच एका ४० वर्षीय पुरुषाचाही मृतदेह त्याच ठिकाणी सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. १५) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नक्की काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिता लक्ष्मण तेलंगे (वय ३५, रा. नळेगाव) आणि राजकुमार हणमंत श्रृंगारे (वय ४०, रा. नळेगाव) अशी मृत आढळलेल्या दोघांची नावे आहेत.
अनिता तेलंगे या धुनी-भांडी करण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार चाकूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते.
दुसरीकडे, राजकुमार श्रृंगारे हे मजुरीचे काम करत असत. ते सुद्धा मागील तीन दिवसांपासून घरातून गायब होते, मात्र त्यांच्याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली नव्हती.
नागरिकांना दिसले मृतदेह सोमवारी दुपारी नळेगाव ते सावंतवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील संगाप्पा महाराज पुलाजवळ असलेल्या घरणी नदीच्या पात्रात दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
पोलीस तपास सुरू मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटली असून, नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. अनिता यांच्या पश्चात पती आणि एक मुलगी आहे, तर राजकुमार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
एकाच वेळी दोघांचे मृतदेह अशा परिस्थितीत सापडल्याने नळेगाव परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण आत्महत्या आहे की घातपात, याबाबत पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. चाकूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा